लिंगायत समाज बांधवांनी मतभेद विसरून एकत्र यावे; अशोक स्वामी

विरशैव लिंगायत समाजात विविध जाती, धर्म असले तरी सामाजिक कार्यासाठी सर्वांनी मतभेद बाजुला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी केले. नियोजित वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळाच्यावतीने आयोजित समाजबांधवांच्या व्यापक बैठकीत ते बोलत होते. समाजातील महिला भगिनी आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने या बैठकीस प्रारंभ झाला. सुरुवातीला बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर विजय हावळे, गजानन आंबी, शिवपुत्र चौगुले, भानुदास तासगावे, आण्णासाहेब शहापुरे यांनी समाजाच्या मजबुत बांधणीसाठी संघटनेची गरज व्यक्त केली. 

अशोक स्वामी म्हणाले कि, सध्या लिंगायत समाजात संघटना कार्यरत आहे. मात्र त्यांचे कार्य मर्यादीत आणि शिक्षण संस्थेसाठीच सुरु असल्याचे दिसून येते. याबाबत समाजबांधवांनी वारंवार आपली कैफियत मांडली आहे. मात्र, मंडळाकडून यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळेच समाजाअंतर्गत असलेल्या विविध विभागांनी आपल्याकडे जमा होणारा निधी केवळ शिक्षण संस्थेकडेच जमा न करता समाजाच्या विविध उपक्रमांसाठी, समाजाच्या विकास कामांसाठी वापरुया. समाजाच्या सर्वांगिण विकासाबरोबरच समाजातील युवक व महिलांसाठी उद्योग, व्यवसायासाठी शासकीय आवश्यक ते प्रयत्न नवीन मंडळाच्या माध्यमातून करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

बैठकीस माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, शिवगोंड पाटील, राजगोंड पाटील, सुनिल पाटील, शिवबसु खोत, सुनील तोडकर, सुकुमार पाटील, स्मिता तेलनाडे, सारीका तेलनाडे, सदा मलाबादे, नागेंद्र पाटील, भारत मुरदुंडे, सुप्रिया मजले, सुवर्णा स्वामी, उषा दरिबे, संजिवनी उरणे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.