महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे आज (28 जून) आज अर्थसंकल्प (Maharashtra Satate Budget 2024) सादर केला जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात चांगलाच फटका बसला.लोकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतं दिली.
त्यामुळे विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना या अर्थसंकल्पाला महत्त्व आले आहे. यावेळी राज्य सरकार तरुण, महिला, शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या घोषणा आणि आकर्षक घोषणा करण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री अजित पवार हे विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करतील.
बेरोजगार तरुणांना 5 हजारांचा भत्ता?
यावेळच्या अर्थसंकल्पात राज्य सरकार अनेक तरतुदी करण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना राबवून राज्यातील गरीब महिलांना 1200 ते 1500 रुपये दरमहा देण्याची तरतूद राज्य सरकार करू शकते. तसेच बेरोजगार तरुणांनाही दरमहा पाच हजार रुपयांचा भत्ता देण्याचीही राज्य सरकार तरतूद करणय्चाी शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील सुमारे पाच लाख युवकांना या योजनेचा लाभ देण्याचा सरकारचा मानस असल्याचे बोलले जात आहे. ही तरतूद केल्यास सरकारचा हा एक ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल.
शेतकऱ्यांसाठी नेमके काय?
राज्य सरकार शेतकऱ्यांसाठीही मोठी आणि भरीव तरतूद करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनाही नव्याने लागू करू शकते. सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद चालू आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांना खुश करण्यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या तरतुदी करण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाने महायुतीला मतं दिली नाहीत. त्यामुळे हीच बाब विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी मुस्लीम समाजासाठीही सरकार काही तरतुदी करण्याची शक्यता आहे.
पेट्रोल डिझेलचा दर कमी होणार का?
गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करावी, अशी मागणी केली जाते. विधानसभा निवडणूक जवळ आलेली असताना राज्य सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून यावरही काही निर्णय घेते का? हे पाहावे लागणार आहे.