आष्टा पालिकेसमोर युवक राष्ट्रवादीने उपोषण केले….

आष्टा शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने शहर अध्यक्ष साजन औघडे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी पालिकेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. दरम्यान मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी आंदोलकांची भेट घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. साजन औघडे म्हणाले, आष्ट्यात सुरू असलेल्या व झालेल्या विकास कामाच्या ठिकाणी नागरिकांच्या माहितीसाठी कामाचे माहिती फलक लावावेत.

तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे व त्यांना पाठिशी घालून जनतेची दिशाभूल करणार्या संबंधित पालिका अधिकार्याला बडतर्फ करावे, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला पालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. नगरपालिका प्रशासन व ठेकेदार सामान्य जनतेची दिशाभूल करीत आहेत. नगररचना अभियंता व या विभागातील संबंधित अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकार्यांना बडतर्फ करून ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे. या मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले होते.

दरम्यान, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन मागण्यांची दखल घेऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. आष्टा पालिकेचे नगर अभियंता गिरीष शेंडगे, प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते तसेच अनिकेत वारे, संदीप औघडे, संदीप सकटे सागर कुरणे, केतन जाधव, शुभम औघडे, लखन आवळे, सचिन घस्ते, शुभम औघडे, अक्षय औघडे बबन दणाने, पप्पू भगत आदी उपस्थित होते.