आष्टा बसस्थानक परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजू उकरल्या आहेत. त्यामुळे रस्ता भुसभुशीत झाला आहे. या रस्त्यावरून वाहतूक करताना अवजड वाहनांची तसेच ट्रॅक्टर ट्रॉलीची चाके रुतून अडकून बसत आहेत. रस्ते कामाचा वाहनधारकांबरोबर आष्टा पोलिसांनाही वाहतूक सुरळीत करताना त्रास होत आहे. आष्टा बसस्थानक समोर हॉटेल्स, बेकरी, गॅरेजसह विविध दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या लावल्या जातात.
वडगावकडून येणारी वाहने, सांगली, इस्लामपूरकडून येणारी वाहने व आष्टा शहरातून डॉ. आंबेडकर मार्गे येणारी वाहने बसस्थानकासमोर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात सामोरासमोर येत असतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. पेठ सांगली रस्त्याच्या कामामुळे आष्टा शहरातील दूधगाव नाक्याजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक रस्त्यातच रुतले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्याने संबंधित ठेकेदाराने एका बाजूने वाहतूक सुरळीत करावी, अशी प्रवाशांतून मागणी होत आहे.