देशात लोकशाही आहे, कासेगाववाल्यांची हुकूमशाही नाही. विकास कामांच्या उद्घाटनासाठी प्रोटोकॉलची आवश्यकता नसते. प्रभागातील नागरिक सुद्धा विकास कामांचा प्रारंभ करू शकतात.३५ वर्षे त्यांनी तुमचं नुकसान केलं. यावेळी परिवर्तन करा. ते मतदारसंघातील नाहीत, त्यांना त्यांच्या मतदारसंघात कासेगावला पाठवा असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी येथे विकास कामांच्या उद्घाटनावेळी आयोजित सभेत केले.विकास कामांच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये (BJP) तणाव निर्माण झाला होता.
भाजपकडून होत असलेल्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी आमदार जयंत पाटील यांना बोलावले नाही. कामाच्या कोनशिलेवर त्यांचे नाव नाही. यासाठी आष्ट्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाणे व नगरपालिकेत निवेदन देऊन, उद्घाटन कार्यक्रमासाठी भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील येत असताना, काळे झेंडे दाखवले. कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधल्या होत्या. भरपावसात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.