दूध भुकटी आयातीचा केंद्र सरकारने घाट घातला असल्याने जिल्ह्यातील दूध संघांबरोबरच उत्पादक शेतकऱ्यांचा याचा फटका बसण्याची शक्यता असून दूध भुकटी आणि दुधाच्या दरावर परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सांगली जिल्ह्यात खासगी दूध संघामार्फत प्रतिदिन सुमारे ३० टन दूध भुकटीचे उत्पादन होते. गेल्या महिन्यात दूध भुकटीचा दर २२० रुपये प्रतिकिलो होता. मुळात गेल्या एक दोन महिन्यांपासून दूध भुकटीची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे उठाव नाही. सध्या दूध भुकटीला प्रतिकिलो २०० रुपये दर आहे.गत महिन्याच्या तुलनेत भुकटीच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे दूध संघ अडचणीत सापडले आहेत. त्यातच आता केंद्राच्या नव्या निर्णयाने दूध संघांपुढे दूध भुटकी विक्रीची अडचण निर्माण झाली आहे. दूध भुकटी आयात केली तर सांगलीतील संघाने तयार केलेली भुकटी विक्री कशी होणार, असा प्रश्न संघांपुढे आहे. परिणामी भुकटीच्या दरात घसरण होण्याची शक्यताही संघाने वर्तवली आहे.
जिल्ह्यात गाई ३ लाख २४ हजार ७५६ तर म्हशी ४ लाख ९३ हजार ९९८ अशी एकूण ८ लाख १८ हजार ७५४ जनावरांची संख्या आहे. जिल्ह्यात सहकारी पाच, खासगी अकरा ११, मल्टीस्टेट दहा असे २६ संघ आहेत. या संघांमार्फत दूध संकलन होते. जिल्ह्यात आजमितीस प्रतिदिन सुमारे १५ लाख दूध संलकल होते. जिल्ह्यातील दोन संघ दूध भुकटी तयार करते. जिल्ह्यातील एकूण दूध संकलनापैकी १ लाख ११ हजार १३५ लिटर दुधापासून भुकटी तयार केली जाते.