यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत पलुस कडेगांव तालुक्यातील सुमारे ९४ घरकुलना मंजुरी मिळाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी दिली. पात्र लाभार्थीनी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी याबाबत अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहनही देशमुख यांनी केले.
देशमुख म्हणाले, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्याचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने होत होते. परंतु मध्यंतरी अडीच वर्षाच्या काळासाठी आघाडीचे सरकार आले आणि ही योजना ठप्प झाली. आता पुन्हा आपले महायुतीचे सरकार आल्यानंतर या योजनेला चालना मिळाली असुन त्यामध्ये कडेगांव तालुक्यातील ७२ तर पलुस तालुक्यातील २२ अशा एकुण ९४ घरकुलाना मंजुरी मिळाली आहे.
याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. चंद्रकांत दादा पाटील, ना. अतुल सावे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री सुरेश खाडे, माजी आ. पृथ्वीराज बाबा देशमुख यांचे सहकार्य मिळाल्याचे संग्राम देशमुख यांनी सांगितले.