कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांसाठी महामंडळाची सुविधा! आषाढीसाठी २५० बस

आषाढी यात्रेनिमित्त एसटीच्या कोल्हापूर विभागाने भाविकांसाठी विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातून २५० बस धावणार आहेत. कोणत्याही गावातून ४४ किंवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध होणार आहे,

तसेच विविध घटकांना या बसमधून सवलतीत प्रवास करता येणार आहे.लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठुरायाच्या भक्तांना आषाढी वारीसह विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचे वेध लागले आहेत. १३ जुलै ते २२ जुलै या कालावधीत आषाढी पंढरपूर यात्रा होत आहे.

त्यासाठी विठुनामाचा जयघोष करत श्रीश्रेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्रा काळात एसटीच्या १२ आगारांतून व्यवस्था केली आहे.या प्रवासात ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासह दिव्यांगासाठी असलेली सुविधा सुरू राहणार आहे.

आगारनिहाय धावणार बस

कोल्हापूर २५, संभाजीनगर २५, इचलकरंजी २५, गडहिंग्लज २३, गारगोटी २३, मलकापूर २३,चंदगड १८, कुरुंदवाड २३, कागल २३, राधानगरी २०, गगनबावडा ४, आजरा १८, एकूण २५०

यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवास, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे, अशाप्रकारे फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लगाम घातला जाणार आहे. कोल्हापूरसह पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारले जाणार आहेत. त्यासाठी सुरक्षा कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.