इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात आवाडेंविरोधात उमेदवार देण्याबाबत हालचाली….

आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांच्याविरोधात कोण प्रबळ उमेदवार असणार याची उत्सुकता आतापासूनच आहे.त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच पडद्यामागील हालचालींना वेग येत आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे.

राहुल आवाडे यांच्या उमेदवारीचीही चर्चा पुढे येत आहे. आमदार आवाडे हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. त्यामुळे ते थेट भाजपकडून की महायुती पुरस्कृत ताराराणी पक्षाचे उमेदवार असणार याबाबतचे चित्र पुढील काळात स्पष्ट होणार आहे. सर्वात महत्त्‍वाचे म्हणजे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना भाजपची यावेळी उमेदवारी मिळणार काय, याबाबत पक्ष कार्यकर्त्यांना आतापासून हूरहूर लागून राहिली आहे.

त्यामुळे आवाडे विरुद्ध हाळवणकर असे लढतीचे चित्र चौथ्यांदा दिसणार काय याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात आतापासूनच आहे. दोघांच्याही पुढील भूमिकांकडे विशेष लक्ष असणार आहे.या पार्श्वभूमीवर आमदार आवाडे यांच्याविरोधात एकास एक लढत देण्याबाबत विरोधकांकडून व्यूहरचना आखण्यात येत आहे.