अजित पवारांच्या नेत्यानं वाढवली शहाजीबापूंची धडधड……

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकीतल्या जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर हेवे-दावे, आरोप- प्रत्यारोपांनी महायुतीत फार काही आलबेल सुरू आहे असं नाही. पण याही परिस्थितीत भाजप, शिवसेना शिंदे गट,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीनही पक्षांचे प्रमुख नेतेमंडळी विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचा दावा करत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित सांगोला मतदारसंघातही मोठा ट्विस्ट समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानं आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांची धडधड वाढवली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता संवाद बैठक नुकतीच पार पडली.

या बैठकीत माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी मोठे संकेत दिले आहे.ते सध्या महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटात आहे. सांगोल्यात सध्या शिवसेना शिंदे गटाचा आमदार आहे. शहाजीबापू पाटलांनी (ShahajiBapu Patil) 2019 ला विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली आहे.त्यामुळे अजित पवार गटाच्या साळुंखे यांनी प्रत्यक्ष विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली नसली तरी त्यांनी ते शर्यतीत असणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहे.

जे कार्यकर्त्यांच्या मनात तेच माझ्याही मनात असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागा असे आदेश दिले आहेत.या पुढील काळात कार्यकर्त्यांना मी कोणताही आदेश देणार नाही तर कार्यकर्ते जी भूमिका ठरवतील तो निर्णय घेणार आहे असे स्पष्ट करत एकप्रकारे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचेच संकेत दिले आहे.त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटलांचे टेन्शन वाढले आहे.