खानापूरात सिद्धनाथाच्या मंदिरात चोरी! तीन तासांत पोलिसांची कारवाई

खानापूर तालुक्यातील मंगरुळ येथे श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी देवीचे मंदिर आहे. या मंदिरात पुजारी समर्थ राजकुमार गुरव ( वय १८, रा. बामणी) हे नियमित पूजाअर्चा करतात. पूजा झाल्यानंतर ते सिद्धनाथ मंदिराच्या कुलपाची चावी गणपती मंदिरात ठेवून घरी निघून जातात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा हा नित्यक्रम सुरू आहे. शुक्रवारी त्यांनी सिद्धनाथ मंदिराच्या दरवाजाला कुलूप घालून त्या कुलपाची चावी गणपती मंदिरात ठेवली होती.

त्यानंतर, शनिवारी सकाळी समर्थ गुरव हे पूजा करण्यासाठी सिद्धनाथ मंदिरात आले असता, त्यांना देवाच्या दोन चांदीच्या मूर्ती अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी त्यांनी विटा पोलिसात शनिवारी सकाळी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलिसांनी शोधमोहीम राबविली. त्यावेळी संशयित अनिल वाघोबा सोरटे याचे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन विटा पोलिस ठाण्यात आणले. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी विटा पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. अनिल सोरटे यास अटक केली.

मंगरुळ येथील सिद्धनाथ व जोगेश्वरी देवाच्या ग्रॅम ८९० वजनाच्या ५० हजार रुपये किमतीच्या दोन अनिल सोरटे चांदीच्या मूर्ती लंपास केल्याची घटना शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी विटा पोलिसांनी तातडीने तपास करीत अवघ्या तीन ते चार तासांत संशयित अनिल वाघोबा सोरटे (वय ५२, रा. मंगरुळ) या चोरट्यास गजाआड केले.