गेल्या काही दिवसांपासून आटपाडी तालुक्यात अनेक गावांत रात्री, तर काही गावांत दिवसा घरफोडीचे सत्र सुरू आहे. दिवसभर टेहळणी करून येथे चोरी होत असल्याची चर्चा आहे. घरफोडी करणाऱ्या टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून आटपाडी तालुक्यात नित्याच्या घरफोड्या सुरू आहेत. दहा दिवसांपूर्वी विभूतवाडी येथे दिवसा घरफोडी झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी करगणी, पुन्हा तडवळे आणि आटपाडीत भवानी नगरमध्ये घरफोडी झाली.
तसेच चार दिवसांपूर्वी दिघंची येथे साळशिंग मळ्यात एका ठिकाणी घरफोडी झाली. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री पाच घरे आणि दोन दुकाने फोडली. यावेळी चोरट्याने सात ते आठ ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. त्यांपैकी तीन ठिकाणी चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून दागिने आणि रोख रक्कम पळवून नेली.
सर्व चोरींमध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. त्या अगोदर दिघंची-आटपाडी रस्त्यावर दिवसा चार वाजता घरात घुसून चाकूचा धाक दाखवून चोरीचा प्रयत्न केला. तसेच गेल्या दोन-तीन महिन्यांत अनेकांच्या मोटारसायकली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.नागरिकांनी सतर्क आणि सजग राहावे. रात्री झोपताना घराचे दरवाजे कुलूपबंद करावेत. दिवसा व रात्री संशयित अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.