अलीकडच्या काळात गुन्हेगारी क्षेत्रात खूपच वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. खून, मारामारी यात वाढ होऊ लागल्याने असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. सोशल मिडीयावर रिल्स टाकत आव्हान देणे इचलकरंजीतील एका युवकाला चांगलेच महागात पडले आहे. कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ओंकार कम लाकर जगदाळे (रा. इचलकरंजी) या युवकाला ताब्यात घेतले. त्यानंतर या युवकाने व्हिडीओद्वारे माफी मागितली. इचलकरंजीत ओंकार जगदाळे याने ‘चुकून जर राहणाऱ्या आडवं येशील, चौकात नाचवीन चौकात’ असे म्हणत कॉलर उडवत रिल तयार करुन ते सोशल मिडीयावर टाकून आव्हान दिले होते.
संबंधीत रिल्स कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे ओंकार जगदाळे याचा शोध घेवून पथकाने त्याला ताब्यात घेतले.ओंकार याने सोशल मिडीयावर टाकलेल्या रिलबद्दल माफी मागितल्याचा व्हिडीओही पोलिसांनी जारी केला आहे. गुन्हेगारी संदर्भात आव्हान देणारे रिल्स कोणीही बनवू नयेत अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रविंद्र कळमकर यांनी केले आहे.