नागाव (ता. हातकणंगले) येथे उच्च दाबाची विजेची तार तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. सुनील बापू शिंदे ( वय ४४ ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना आज (दि.६) सकाळी आठ वाजता घडली.
कष्टाळू तरूणाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नागाव गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. Kolhapur News
माहितीनुसार, सुनील शिंदे हे शिरोली एमआयडीसीमधील एका कंपनीत काम करत होते. शुक्रवार (दि.५) रात्रपाळी करून ते सकाळी घरी आले. कसणेसाठी घेतलेल्या शेतात औषध फवारणी करावयाची आहे म्हणून औषध फवारणी पंप घेऊन शेतात गेले. औषध फवारणी करत असताना शेतातुन गेलेली उच्च दाबाची विजेची तार तुटून त्यांच्या अंगावर पडली. ते जागीच ठार झाले. जवळ असलेल्या शेतकऱ्यांनी आरडाओरड केली. गावात ही घटना कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.
शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर सिपिआर रुग्णालयात पाठविण्यात आला. सुनील शिंदे यांच्या पश्चात आई पत्नी मुलगा असा परिवार आहे.