२०२४ हे वर्ष सुरु झालेले आहे. हे वर्ष लोकसभा निवडणुकीचे असणार आहे. सर्व पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. राज्यातला शेवटच्या क्रमांकाचा म्हणजे 48 वा मतदारसंघ असलेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदा जोरदार टशन पाहायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे आव्हान असणार आहे.
निवडणुकीच्या आखाड्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे पुत्र प्रतीक पाटीलही उतरण्याची चर्चा आहे. त्यातच आता शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव (Shiv Sena Murlidhar Jadhav) यांनी निष्ठावंत शिवसैनिकाला संधी देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. धैर्यशील माने आणि राजू शेट्टी यांच्यातील लढत निश्चित आहे, पण शिवसेना ठाकरे गटाने जर राजू शेट्टी यांना पाठिंबा न देता मुरलीधर जाधवांना संधी दिली तर या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
हातकणंगले हा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ येतो. त्यामुळे त्यांची ताकतही या ठिकाणी मोठी आहे. शिवसेनेतील फुटीनंतर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून हातकणंगलेवर बारीक नजर असून या ठिकाणी विजयासाठी सूक्ष्म नियोजन केलं जात आहे. त्यामुळे 2024 सालच्या निवडणुकीत महायुतीचे धैर्यशील माने दुसऱ्यांदा बाजी मारणार की राजू शेट्टी कमबॅक करणार याकडे लक्ष आहे. होमग्राऊंडवर जयंत पाटील सेना-भाजपच्या रणनीतीचा टप्प्यात घेऊन करेक्ट कार्यक्रम करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील या जागेवर स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत असलेल्या धैर्यशील मानेंनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर माने गट, शिवसेनेची ताकद आणि राष्ट्रवादी तसेच कारखानदारांची छुपी मदत याच्या जोरावर धैर्यशील मानेंनी 96 हजार मतांनी शेट्टींचा धुव्वा उडवला आणि हातकणंगले मतदारसंघात प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला.