आजारी आईला दवाखान्यात नेताना युवकाचा अपघाती मृत्यू!

खोची येथील नानीवळे धरणग्रस्त वसाहतीतील आदित्य जाधव हा त्याची आई आजारी असल्याने भेंडवडे येथे दवाखान्यात घेऊन गेला होता. उपचार घेऊन परतत असताना त्यांची दुचाकी ( क्र.एम एच ०९ बी यु ४४३० ) भेंडवडे येथील गणपती मंदिर समोरच्या चौकात आली. याचवेळी सांगलीकडून सिमेंटच्या पाईप घेऊन वडगावकडे निघालेल्या ट्रक (एम एच ०६ सीए ०९४) ची समोरून दुचाकीला धडक बसली. यावेळी आदित्य जाधव व सारिका जाधव या दुचाकी गाडीसह ट्रकच्या खाली पडले. यामध्ये आदित्यचा जागीच मृत्यू झाला.

तर सारिका जाधव गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जावेद रोटीवाले, अमन मुजावर, माधुरी वडिंगेकर, पोपट माने यांनी घटनास्थळी पंचनामा केला.अपघाताची घटना मुख्य चौक परिसरात त्यामुळे घडल्यामुळे भेंडवडे, खोची, धरणग्रस्त वसाहत ग्रामस्थ व आदित्यच्या मित्रमंडळींनी मोठी गर्दी केली होती.

ट्रकचा वेग एवढा जबरदस्त होता की धडकेनंतर या ट्रकने दुचाकीला तीस फुटाहून अधिक अंतर फरपटत नेले. यात दुचाकींचा चक्काचूर झाला. यादरम्यान पेट्रोलची टाकी फुटल्याने दुचाकीला आग लागली. घटनास्थळी उपस्थित तरुणांनी प्रसंगावधान राखत गाडी बाहेर काढून आग विझवली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.