राज्यात पुणे, मुंबई आदी मोठ्या शहरांत झिका व्हायरसचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आषाढी यात्रेवर झिका व्हायरसचे सावट असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला असून, भाविकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभाग, प्रशासन सज्ज झाले आहे.आषाढी यात्रेत पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनासाठी १५ लाखांहून अधिक भाविक येणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
यामुळे यात्रेत येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.यात्रा कालावधीत राज्यातील विविध भागातून तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथून मोठ्या प्रमाणावर भाविक पंढरपूरला येतात. सध्या मात्र राज्यातील मुंबई, पुणे येथे झिका व्हायरसचे सर्वांत जास्त रुग्ण आढळले आहेत.
केंद्र शासनाने राज्य शासनाला झिका रुग्णांच्या आरोग्याची काळजी घ्या, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच लवकरात लवकर याबाबत उपाययोजना करा, असे पत्र आरोग्य विभागाला देण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह विविध राज्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.
यामुळे आषाढी यात्रेत झिकाच्या रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी पंढरपूर शहरात विविध तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे.
या शिबिरात भाविकांची तपासणी करून औषधोपचार देण्यात येणार आहेत.भाविकांना वैद्यकीय सुविधा मिळावी म्हणून ६५ एकर, दर्शन मंडप, चंद्रभागा वाळवंट, बसस्थानक, रेल्वे स्थानक याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, याची दक्षता आरोग्य विभागाने घेतली आहे.