आर. आर. पाटील यांचे कार्य रोहित पुढे नेत आहे. त्यामुळे तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील हेच आमचे उमेदवार असतील, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
यावेळी त्यांनी रोहितच्या पाठीशी जनतेने खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन केले.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याच्या मैदानावर शेतकरी मेळावा सोमवारी झाला. यावेळी शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना सांगली जिल्हा परिषदेमध्ये एका कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
यावेळी एका सामान्य कुटुंबातील जिल्हा परिषदेचा सदस्य आपल्याकडे शेतकऱ्यांची गाऱ्हाणे घेऊन आला. आर. आर. पाटील नावाच्या या तरुणाला हेरले आणि विधानसभेची उमेदवारी दिली. ते निवडून आले.राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर आम्ही आर. आर. पाटील यांना ग्रामविकास खाते दिले. त्यांनी ग्रामविकासचा चेहरा मोहरा बदलला. त्यांच्यातील नेतृत्वगुण हेरून त्यांना गृहमंत्री पद दिले. त्यांनी पारदर्शक कारभार करून आपल्या पक्षाचा आणि खात्याचा नावलौकिक वाढवला. आपली निवड सार्थ असल्याचे आजही माझे मन सांगते, असे आर. आर. पाटील यांचे कौतुक शरद पवार यांनी केले.
राज्यात परिवर्तन अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच साखर आणि दूध व्यवसायाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारवरही शरद पवार यांनी आपल्या भाषणात आसूड ओढला. तसेच महांकाली साखर कारखान्याला मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तासगाव-कवठेमहांकाळ हा प्रगतशील मतदारसंघ व्हावा, या विचाराने सुमनताई पाटील आणि आमचे प्रयत्न सुरू आहेत. या मतदारसंघातून शक्तिपीठ महामार्ग होऊ नये यासाठी शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतणार असल्याचे आश्वासन रोहित पाटील यांनी दिले.
महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महांकाली साखर कारखाना सुरू करण्याबाबतची मागणी केली. आमदार अरुण लाड, चिमण डांगे, विराज नाईक, गणेश पाटील, विश्वास पाटील यांची मनोगते झाली. या कार्यक्रमाला सुरेश पाटील, सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, शंकरराव पाटील, अमोल शिंदे, विकास हाक्के, संजय पाटील, सुरेखा कोळेकर, कुसुम कोळेकर, बाळासाहेब पाटील, बाबासाहेब मुळीक, संजय पाटील, छाया पाटील, महेश पवार, दादासाहेब कोळेकर, महेश पाटील, शंतनू सगरे, अर्जुन गेंड, आदी उपस्थित होते. अमर शिंदे यांनी आभार मानले.