सांगलीतून मराठा आंदोलनासाठी १ हजार गाड्या देणार! चंद्रहार पाटील

मुंबईत २० जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील आमरण उपोषण करणार आहेत. या आंदोलनासाठी जाण्यासाठी आपण सांगली जिल्ह्यातून एक हजार गाड्या देणार असल्याची माहिती डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी दिली.

राज्य सरकारने मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण देण्याचा कायदा तातडीने पास करावा, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केली आहे. त्यासाठी ते मराठा समाजाच्यावतीने मुंबईमध्ये मोठे आंदोलन उभारणार आहेत. या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आता चंद्रहार पाटील यांनी सांगली जिल्ह्यातून पुढाकार घेतला आहे.

याबाबत पाटील म्हणाले की, येत्या २० जानेवारीला सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून १०० अशा एकूण दहा तालुक्यातून एक हजार गाड्या आपण डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनच्यावतीने देणार आहोत. त्यासाठीचा आवश्यक तो सगळा खर्च या फाउंडेशनच्यावतीने करण्यात येणार आहे, असेही पै. पाटील यांनी सांगितले.