विधानसभा निवडणुकीत भाजपकडून होऊ शकते परतफेड….

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास महिना लोटला तरीही अजित पवारांचा आपल्याला काय फायदा झाला? या प्रश्‍नाची चर्चा भाजपच्या गोटातून अद्यापही संपत नाही. अजित पवार सोबत नसताना जिल्ह्यातील माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपने २०१९ मध्ये काबिज केला होता.अजित पवार सोबत आल्यानंतरही भाजपला २०१९ मध्ये हे दोन्ही मतदारसंघ गमवावे लागले आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता दिसत आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची सल कदाचित विधानसभा निवडणुकीतील परतफेडीतून बाहेर काढली जाऊ शकते.

अजित पवार एकटेच आपल्यात आले आहेत, त्यांच्यासोबत त्यांचा मतदार आला नसल्याची भावना आता उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने असतानाही या मतदारसंघात भाजपला ६३ हजारांनी मायनस जावे लावले.तशीच स्थिती माढ्यात राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या बबनराव शिंदे यांच्या विधानसभा मतदासंघात भाजपला ५२ हजारांनी तर करमाळ्यात राष्ट्रवादी पुरस्कृत आमदार असलेल्या संजय शिंदे यांच्या मतदारसंघात ४१ हजारांनी मायनस जावे लागले. या तिन्ही मतदारसंघात अजित पवारांची ताकद आहे, या ताकदीने ऐनवेळी दगा दिल्याची भावना वाढीस लागू लागली आहे.

भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचा एकमेव आमदार सध्या सांगोल्यात शहाजी पाटील यांच्या रुपाने आहे. त्या ठिकाणीच फक्त भाजपला ४ हजारांच्या दरम्यान मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे कमळ आणि धनुष्यबाण इथपर्यंत राजकिय गणित ठिक आहे. घड्याळ आपल्यात रुचत नाही, अशी भावना आता भाजपचे कार्यकर्ते बोलून दाखवून लागले आहेत. विधानसभेला काय होणार? घड्याळ पुन्हा सोबत असणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर उत्तर, पंढरपूर-मंगळवेढा, माळशिरस या ठिकाणी सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. बार्शीत भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे या सहा जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघ भाजपच लढते, शिवाय जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ पैकी सहा जागा भाजपला मिळण्याचे जवळपास निश्‍चित असल्याने जिल्ह्याच्या महायुतीत भाजपच मोठा भाऊ ठरत आहे.करमाळा, मोहोळ, माढा हे तीन विधानसभा मतदारसंघ महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू शकतात. सांगोला हा एकमेव मतदारसंघ महायुतीतून शिवसेनेकडे असल्याने त्याला दुसरा मतदारसंघ म्हणून सोलापूर शहर मध्यकडे पाहिले जात आहे.