सांगोला शहर व उपनगरात नगरपरिषद अंतर्गत भुयारी गटार योजनेचे काम सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते उखडून ठेवले आहेत. शहरात नागरिकांना येताना आणि जाताना सर्वत्र प्रचंड धूळ उडते. या उडणाऱ्या धुळीमुळे जवळपास ५० हजारांहून अधिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जे नागरिक नियमित शहरांमध्ये कामानिमित्त फिरतात त्यांना दमा, श्वसनाचे विकार वाढत आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सांगोला नगरपरिषदेकडे केली जात आहे. सांगोला शहरातील भुयारी गटार योजनेकरिता मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होऊन काम प्रगतीपथावर सुरू आहे.
शहरातील सर्वच भागात रस्ते खोदून या पाईपलाईनचे काम सुरू आहे. पण हे काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पूर्ववत चांगले रस्ते केव्हा होणार? असा प्रश्न शहरवासीयांमधून उपस्थित होत आहे. शहरामध्ये विविध कामानिमित्त तालुक्यातील ग्रामीण वाढलेले आहे. नगरपालिका शहरातील सर्व नागरिकांकडून कर वसुली सक्तीने करते. मग नागरी सुविधाही नगरपालिकेने तत्काळ पुरवून दररोजची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.