इचलकरंजीत आता घरोघरी होणार कचरा संकलन!

सध्या शहरात आदर्श कंपनीच्या वतीने घरोघरी जाऊन घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलित केला जातो. अन्य ठिकाणी साचलेला कचरा उठाव करण्याचे कामही या संस्थेकडे आहे. मुदत संपल्यानंतरही कंपनीला सतत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पाच वर्षे या कंपनीकडेच हे काम आहे.

जुन्या दरामध्ये हे काम सुरू असल्यामुळे मक्तेदार कंपनीकडून कामामध्ये ढिलाई होत असल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अलीकडे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. अनेक ठिकाणी वेळेवर कचरा उठाव केला जात नाही.

याबाबत नागरिकांच्याही तक्रारी वाढत आहेत.या पार्श्वभूमीवर महापलिका प्रशासनाकडून घरोघरी कचरा संकलन व उठाव करण्याच्या कामाची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या शिवाय विविध आठ वॉर्डातील स्वच्छतेच्या कामाचा मक्ता दिला जाणार आहे. यापूर्वी पाच वॉर्डात मक्ता पद्धतीने स्वच्छता केली जात होती.

पण सध्या महापालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे आणखी तीन वॉर्डाची त्यामध्ये भर घातली आहे. या कामाचीही निविदा काढली जाणार आहे.ती पूर्ण होण्यास महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दोन्ही कामांसाठी तब्बल १४ कोटी वार्षिक खर्च प्रस्तावित केला आहे. येत्या आठवड्याभरात दोन महत्त्वाच्या निविदा काढण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासनाकडून याबाबतची गतीने कार्यवाही सुरू आहे.

यामध्ये घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्यासह एकूण आठ वॉर्डातील स्वच्छतेचे काम खासगी पद्धतीने केले जाणार आहे. सुमारे १४ कोटींच्या दोन्ही कामाच्या निविदा काढल्या जाणार आहेत. त्यामुळे पुढील कालावधीत पुन्हा एकदा शहरातील स्वच्छतेबाबत सुसूत्रता येणार आहे. १५ व्या वित्त आयोगातून अथवा महापालिका फंडातून या खर्चाची तरतूद केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.