इचलकरंजीत आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाची धावपळ……

लोकसभा निवडणूकीची आचारसंहितेची घोषणा आज केंद्रीय निवडणुक आयोगाकडून केली जाणार आहे. आचारसंहितेमुळे इचलकरंजी महापालिकेच्या सुरू असलेल्या तसेच मंजूर झालेली विविध विकास कामे तसेच अन्य महत्वाची प्रकरणे आचारसंहितेच्या गर्तेत अडकू नयेत, यासाठी महापालिकेची यंत्रणा गतीमान केल्याचे दिसून आले. अनेक विकास कामांचे कार्यादेश देण्याबरोबरच आचारसंहिता अमंलबजावणीबाबत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा आज झालेल्या खातेप्रमुखांच्या बैठकीत घेण्यात आला.

महापालिकेला ३१ मार्चपर्यंत घरफाळा आणि पाणीपट्टी वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करावे लागते. मात्र आता आचारसंहितेमुळे प्रशासकीय यंत्रणा निवडणुक कामांत व्यस्त झाल्यास आगामी काळात त्याचा कर वसुलीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उपलब्ध यंत्रणेवर घरफाळा वसुली करताना चांगलीच धावपळ होणार आहे.

महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी शासनाकडून अनेक विकास कामांना मंजुरी दिली आहे. यापैकी काही कामांच्या निविदा निघाल्या आहेत. तर काही कामांच्या मंजुरीनंतर ठेकेदारांना कामाचे आदेश देण्यात आले नाहीत. या शिवाय प्रशासकीय कामकाजातील पुढील कार्यवाही थांबलेली आहे.

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागल्यानंतर महापालिकेची बहुतांशी यंत्रणा ही निवडणूक कामात व्यस्त होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाला काहीअंशी ब्रेक लागणार आहे. त्याचबरोबर विविध कामांसाठी महापालिकेत येणारे नेते तसेच नागरिकांची वर्दळही किमान एक- दिड महिने थांबणार आहे.


+