पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी ३४० कोटींची मंजुरी: शिंदे

पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीत जाणाऱ्या उर्वरित सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी ३४० कोटी रुपयांची मंजुरी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी मंजूर केलेल्या ६३४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण आणि उद्‌घाटन सोहळा श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते.पंचगंगेत जाणारे सर्व सांडपाणी आता शुद्ध होऊन पंचगंगा १०० टक्के प्रदूषणमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, रविकांत अडसूळ, माजी नगरसेवक राहुल चव्हाण उपस्थित होते.