सध्या आषाढी वारीचे वेध सर्व वारकऱ्यांना लागलेले आहे. श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीचा सोहळा १७ जुलैला पंढरीत रंगणार आहे. त्यानिमित्ताने प्रशासनाची तयारी करण्यात आली आहे. विविध दिंडी व पालख्या पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत. आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक- प्रवाशी येतात. अनेक प्रवाशी स्वतःच्या खाजगी वाहनाने, रेल्वेने एसटीने अथवा विविध पालखी बरोबर चालत दिंडीने येतात, या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे.
श्री क्षेत्र पंढरपूर येथे १५ जुलै ते १९ जुलै दरम्यान पंढरपूर आषाढी वारी दरम्यान एसटीने प्रवास करणाऱ्या श्री विठ्ठल भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून आषाढी वारीसाठी सांगोला आगार मार्फत जादा २० बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. ४० पेक्षा जास्त प्रवासी असतील तर बस आता वारकऱ्यांच्या थेट गावातून पंढरीत येणार आहेत. यासह ३ ठिकाणी बस तपासणी पथक कार्यान्वित करण्यात आली आहे. आषाढी वारीसाठी भाविकांची मागणी लक्षात घेवून जादा बस सोडण्यात येणार आहेत. पंढरपूर न्यायालय येथे प्रवासी सोडण्यात येणार आहेत.
तसेच यंदा स्थानिक पोलिस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत. गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या मार्गावर ठीक ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी एसटीचे सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात २४ तास नजर ठेवून असणार आहेत. असे ही आगार प्रमुख विकास पोफळे यांनी सांगितले आहे.