अज्ञात चोरट्याकडून घरासमोर लावलेल्या पिकअप गाडीची चोरी

अज्ञात चोरट्याने राहत्या घरासमोरील लावलेली तीन लाख रुपये किमतीची पिकअप चोरुन नेली. ही घटना मंगळवारी पहाटे एक ते सकाळी सहाच्या दरम्यान कमलापूर ( ता. सांगोला) येथे घडली आहे.  राहुल भाऊसाहेब पवार (वय २७, व्यवसाय – चालक, रा. निळवंडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर, सध्या रा. सिंहगड कॉलेजजवळ, कमलापूर, ता. सांगोला) याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याने मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पांढऱ्या रंगाची पिकअप चारचाकी गाडी (एमएच १४ – ईएम ३०२२)
राहत्या घरासमोर लावली व ते घरात झोपी गेले होते.

दरम्यान, फिर्यादी चालक राहुल पवार यास सकाळी सहा वाजता जाग आली व ते घराबाहेर आले असता त्यांना घरासमोर लावलेली पिकअप गाडी दिसून आली नाही. त्यांनी दिवसभर गाडीचा शोध घेतला पण ती मिळून आली नाही. त्यामुळे त्यांची खात्री झाली की आपली पिकअप गाडी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. याबाबत राहुल पवार यांनी चोरट्याविरुद्ध पिकअप गाडी फिर्यादीच्या संमतीवाचून त्यांचे आर्थिक फायद्याकरिता चोरुन नेली असल्याबाबत फिर्याद दाखल केली आहे.