खानापूर मतदारसंघात विधानसभेला बंडखोरी होणार की……

सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीत प्रत्येक पक्ष तयारीला लागलेला आहे.उमेदरीसाठी नेतेमंडळीची चाचपणी सुरु आहे. आटपाडी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खानापूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. आटपाडी तालुक्याच्या अस्मितेसाठी १९९५ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती घडविण्यासाठी हालचालींनी वेग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेला बंडखोरी होणार का? कोणी बंडखोरी केल्यास आटपाडीतील सर्वपक्षीय नेते व मतदार एकजुटीने त्याला साथ देणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघात खानापूर व आटपाडी या दोन तालुक्यांचा समावेश आहे.

मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून केवळ १९९५ साली बंडखोरी करत राजेंद्रअण्णा देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढविली. त्यांना सर्वांची साथ मिळाल्याने तत्कालीन आमदार अनिल बाबर यांचा पराभव झाला होता. हा अपवाद वगळता आतापर्यंत विधानसभेला आटपाडी तालुक्याचे नेतृत्वच मिळाले नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आटपाडी तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहे. खानापूर तालुक्यालाच पुन्हा आमदारकीला संधी द्यायची की १९९५ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती करायची, अशी चर्चा सुरू आहे.

आटपाडी तालुक्यात राजेंद्रअण्णा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, स्वर्गीय आमदार अनिल बाबर समर्थक जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांचे गट कार्यरत आहेत. सध्या देशमुख व पडळकर भाजपामध्ये आहेत. तानाजी पाटील शिवसेनेच्या शिंदे गटासोबत आहेत. सर्वच नेते महायुतीत असले तरी प्रत्येकाचा सवतासुभा आहे.