लोकसभा निवडणुकीतील निकाल पाहता, विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या दक्षिण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच वर्चस्व राहण्याची शक्यता आहे.प्रत्यक्ष निवडणुकीत महायुती आणि महाविकासमधील सर्वच पक्ष एकत्र लढणार की, स्वतंत्रपणे यावर निकाल अवलंबून असला, तरी सद्यःस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याविषयी सहानुभुतीचे वातावरण आणि काही मतदारसंघांत सत्ताधाऱ्यांविरुद्धची नाराजी दिसत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हापुरातून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. २५ वर्षांनंतर ही जागा काँग्रेसने खेचून आणली. सांगली लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून मारलेली बाजी राज्यात चर्चेची ठरली. सोलापूरमध्येही काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाजपला धूळ चारली. एकूणच महाविकास आघाडीने लोकसभेत महायुतीला धोबीपछाड केले.
सोलापूर जिल्ह्यात मराठा, धनगर आणि लिंगायत समाज निर्णायक ठरतो. आता लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपकडून हा मतदारसंघ खेचून आणला. या जिल्ह्यात खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांचा प्रभावही निर्णायक परिणाम करणारा असणार आहे. अकरा मतदारसंघांपैकी काही मतदारसंघांत विद्यमान आमदारांविरुद्ध असलेल्या नाराजीचा फायदा विरोधकांना होण्याची शक्यता आहे. ‘सकाळ’ने केलेल्या सर्वेक्षणातही या तीन जिल्ह्यांत महाविकास आघाडीची सरशी होईल, असा कौल आता मतदारांनी दिला आहे, तर भाजप हा या ठिकाणी क्रमांक एकचा पक्ष होईल, असाही कौल सांगत आहे. जशी निवडणूक जवळ येईल, उमेदवार निश्चित होतील, त्यानुसार सत्तेचा गोलक फिरत राहणार आहे.