बॉलिवूड कलाकार आणि माजी क्रिकेटपटू करत असलेले तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती क्रिकेटचे सामने सुरू असताना मैदानात लावू नये अशी विनंती केंद्रीय आरोग्य मंत्रालय बीसीसीआयला करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अलिकडील काही महिन्यांमध्ये बॉलिवूड कलाकार आणि माजी क्रिकेटपटू धूरविरहित तंबाखू उत्पादन निर्मात्यांद्वारे निर्मित ‘इलायची’ माऊथ फ्रेशनर्सच्या जाहिराती करताना दाखवण्यात येत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि व्हायटल स्ट्रॅटेजीज या जागतिक आरोग्य संस्थेने मे महिन्यात ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे नमूद केले आहे की, 2023 मध्ये धूम्रपानरहित तंबाखू (SLT) ब्रँडच्या सर्व जाहिरातींपैकी
तब्बल 41.3% जाहीराती एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकातील शेवटच्या 17 सामन्यांदरम्यान प्रदर्शित केल्या गेल्या होत्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) क्रिकेटच्या मैदानावर माजी क्रिकेटपटू आणि बॉलिवूड सेलिब्रिटी करत असलेल्या ‘गुटखा’च्या सरोगेट जाहिराती दाखवणे थांबवावे यासाठी विनंती करणार आहे. अनेक क्रिकेट मैदाने आयपीएल सारख्या लोकप्रिय स्पर्धांचे आयोजन करताना पान मसाला आणि गुटख्यासह धुरविरहित तंबाखू उत्पादनांच्या जाहिराती प्रदर्शित करतात.
आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत आरोग्य सेवा महासंचालनालय बीसीसीआयला तंबाखूचा प्रचार करणाऱ्या जाहिरातींचे प्रसारण थांबविण्यास सांगणार आहे.