हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील आजी माजी खासदारांचे मौन…

किल्ले विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमणावरून झालेल्या हिंसाचाराने गजापूर पैकी मुसलमान वाडी आज ही आगीने धुमसत आहे. ज्या मुसलमान वाडीचा अतिक्रमणाशी कोणताही संबंध नसताना जमावांकडून जवळपास 20 ते 25 घरांना लक्ष करण्यात आले.कोट्यावधीचं नुकसान करून वाहनांची तोडफोड करण्यात आली.

इकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ही मुसलमान वाडी आजही धुमसत असताना, तिकडे विद्यमान आमदार उद्योगपतींच्या लग्नात आणि मतदारसंघातील सत्कार समारंभात व्यस्त आहेत. तर माजी खासदारांनी देखील या घटनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात गजापूर पैकी मुसलमानवाडीचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून किल्ले विशाळगड आणि पायथ्यावरील दिलेल्या 158 अतिक्रमणधारकांविरोधात लढा सुरू आहे. रविवारी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर या लढ्याला हिंसक वळण लागले.

ज्याचा अतिक्रमण बाबत कोणताही संबंध नाही अशा मुसलमान वाडी या गावातील वीस ते पंचवीस कुटुंब यांची राहती घर उध्वस्त करण्यात आली. वाहने जाळण्यात आली. मतदारसंघात इतका हिंसाचार होत असताना विद्यमान खासदार धैर्यशील माने मात्र उद्योगपतींच्या लग्नात व्यस्त होते. इतकेच नव्हे तर या दौऱ्यानंतर या घटनास्थळी भेट देण्याऐवजी त्यांनी मतदारसंघातील सत्कार समारंभाला उपस्थिती लावली.

मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असताना लोकप्रतिनिधीने शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयमाची भूमिका घेऊन प्रयत्न करणे गरजेचे होते. शिवाय प्रतिनिधी म्हणून मुसलमान वाडीतील नागरिकांना आधार देण्याची गरज होती.किंवा त्या घटनेबाबत शोक व्यक्त करणे गरजेचे होते.

मात्र त्याबाबत कोणताच विचार विद्यमान खासदारांचा दिसत नाही. त्याचे गांभीर्य विद्यमान खासदारांना नाही का? सवाल मुसलमानवाडीतील पीडित कुटुंबियांनी केला.इतकेच नव्हे तर माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील या प्रकरणावर मौन बाळगले आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दोन वेळा प्रतिनिधित्व केलेले शेट्टी यांनी या घटनेबाबत साधा चकार ही शब्द काढलेला नाही. इतकेच नव्हे तर या घटनेचा निषेध नोंदवलेला नाही. तर शाहूवाडीचे विद्यमान आमदार विनय रावजी कोरे यांनी देखील या घटनेबाबत मौन बाळगले आहे.