विटा कोर्टाचा मोठा निर्णय! पत्नीच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेप….

पलूस तालुक्यातील धनगाव गावच्या हद्दीत एका कॅनॉल झोपडपट्टीत 18 सप्टेंबर 2021 रोजी पहाटे चार वाजण्याच्या पूर्वी आरोपी गणपत दाजी पवार यांने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नी कांताबाई गणपती पवार हिचा कोयत्याने हल्ला करून खून केला होता. यानंतर भिलवडी पोलीस ठाण्यात गणपती पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव आणि भिलवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी विरुद्ध कसून तपास करून न्यायालयासमोर सबळ पुरावे सादर करण्यात आले. यानंतर काल शुक्रवार 19 जुलै रोजी पत्नीचा खून केल्याप्रकरणी विट्यातील जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला.

त्यानुसार खून प्रकरणातील आरोपी गणपत दाजी पवार वय ५० राहणार धनगाव ता.पलूस जि. सांगली मुळगाव आंबेगाव ता. मावळ जि. पुणे याला विटा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर आर भागवत यांनी जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा देखील यावेळी न्यायालयाने सुनावली आहे.

याप्रकरणी तपासी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक के. जे. कोडग, सरकारी वकील म्हणून व्ही . एम. देशपांडे आणि भिलवडी पोलीस ठाण्याचे कोर्ट अंमलदार अंकुश लुगडे तसेच पोलीस कर्मचारी माधुरी सदाकळे यांनी सरकार पक्षास सहकार्य केले.