बिहारला पूरस्थितीसाठी 18 हजार कोटी, महाराष्ट्रातील पूर दिसत नाही का? 

“महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडतोय अस म्हणणार नाही, तर भयंकर पूर परिस्थिती निर्माण झालीय. धोक्याची पातळी ओलांडून पुढे गेली आहे. कालच्या बजेटमध्ये पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी बिहारला 18 हजार कोटी दिले. या सरकारला, या बजेटची वाहवा करणाऱ्या राज्यातील नेत्यांना सवाल आहे, त्यांना राज्यातील पूर दिसत नाही का?” असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विचारला. “बिहारला 18 हजार कोटी दिले, आम्हाला 18 कोटी तरी द्या, अशी म्हणायची हिम्मत यांच्यात आहे का?” असं संजय राऊत म्हणाले. “महाराष्ट्राला या परिस्थतीचा सामना करण्यासाठी दमडी पण दिली नाही. पण पेन्सिल घेऊन बसलेले यावर बोलतील का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. तीन वर्षांपूर्वी फडणवीस यांनी त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “अनिल देशमुखच का, भाजपच्या अनेक लोकांनी मलाही हे सांगितल होतं. अशोक चव्हाण, प्रफुल पटेल का गेले हे बघितलं की लक्षात येईल. अनिल देशमुख मला तुरुंगात भेटायचे तेंव्हा मला त्यांनी तुरुंगात सांगितल होतं. त्यांनी सांगितलं ते सत्य आहे, पण त्याला पुरावा देता येत नाही”

“क्लिप बनवणं हे भाजपला जमतं. फोन चोरून ऐकले अशा महिला पोलीस अधिकाऱ्याला फडणवीस यांनी पोलिस महासंचालक केलं. त्यांच्याकडून काय अपेक्षा करता?” असं राऊत म्हणाले. “राज्याच्या राजकीय संस्कृतीच अधिपतन फडणवीस आणि त्यांच्या टोळीने केलं. नरेंद्र मोदी जसे नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान आहेत, तसे राज्याला नॉन बायोलॉजिकाल गृहमंत्री लाभले आहेत. असं घाणेरड राजकारण या देशात अमित शाह आणि राज्यात फडणवीस यांचा उदय झाल्यापासून सुरू झालं” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “ज्यांना अटक करावी ते संसदेत बसले आहेत. ज्यांना तुरुंगात पाठवायला पाहिजे, त्यांना भाजपने पक्षात घेऊन मंत्री, खासदार केलय. न्याय यंत्रणा नादान झालीय, हे केजरीवाल यांच्या प्रकरणातून दिसून येतय” असं संजय राऊत म्हणाले.