सांगली (Sangli) जिल्ह्यातही सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain)सुरु आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळं कृष्णा नदीच्या (Krishna River) पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे.सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी ही 36 फुटांवर जाऊन पोहोचली आहे.
सांगलीतील कर्नाळ रस्त्यावरती पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पलूस तालुक्यातील भिलवडी भुवनेश्वरवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे.
कोयना आणि चांदोली धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यानं वारणा आणि कृष्णा नद्यांना सध्या पूर आला आहे. कोयना धरणातून 20000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळं कृष्णेच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
नदीचे पाणी दुकानात शिरणाऱ्या कृष्णा नदी काठच्या सर्वच गावातील दुकानदारांनी देखील रात्रीच दुकानातील साहित्य इतरत्र हलवायला सुरुवात केली आहे.