काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वादात आता ठाकरे गटाची उडी…

लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला. विशेष म्हणजे आता विधानसभा निवडणुकीच्याआधीदेखील सांगली जिल्ह्यातील जागांवरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हं आहेत. सांगलीत खासदार विशाल पाटील यांच्या विजयानंतर तिथल्या स्थानिक काँग्रेस पक्षांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. विशाल पाटील यांनी नुकतंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगलीतील इस्लामपूर-वाळवा विधानसभा मतदारसंघातील गावात जावून सूचक वक्तव्य केलं. आपलं या विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष असेल, असं विशाल पाटील म्हणाले. विशेष म्हणजे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम हे देखील संबंधित कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांनीदेखील आपल्या भाषणातून जयंत पाटील यांना इशारा दिला. यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघातील विधानसभांच्या जागांवरुन काँग्रेस आणि राष्ट्रादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात वादाची ठिणगी पडलेली आहे, असं असताना या वादात आता ठाकरे गटानेदेखील उडी घेतली आहे.

डबल महाराष्ट्र केसरी आणि लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटलांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. शिवसेना ठाकरे गट आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या दोन जागा लढवणारच, अशी भूमिका चंद्रहार पाटील यांनी मांडली आहे. खानापूर-मिरज विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढवणार, असं चंद्रहार पाटील म्हणाले आहेत.

लोकसभेतील गद्दारी पुन्हा जिल्ह्यात कराल तर राज्यात किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा चंद्रहार पाटील यांनी दिला. चंद्रहार पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हा इशारा दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रामाणिक कष्टामुळे राज्यात काँग्रेस 1 वरून 13 वर आणि राष्ट्रवादी 4 वरून 8 वर गेली. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेत चांगलीच गद्दारी केली, असा आरोप चंद्रहार पाटील यांनी केला.