पंचगंगा नदीतील पुराचे पाणी ६८ फुटांची इशारा पातळी गाठल्यानंतर नागरी वस्तीत घुसले आहे. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर सुरू केले आहे. बहुतांशी कुटुंबांनी नातेवाईकांकडे आश्रय घेतला आहे. सायंकाळपर्यंत ६ कुटुंबातील २५ नागरिकांनी महापालिकेने सुरू केलेल्या घोरपडे नाट्यगृहात स्थलांतरीत केले आहे. या शिवाय १५ जनावरांची छावणीत व्यवस्था केली आहे.
पूरग्रस्तांच्या स्थलांतरासाठी महापालिका कर्मचाऱ्यांचे पथक तैनात असून त्यांच्या मदतीने प्रापंचिक साहित्य हलविण्याचे काम सुरू आहे. पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी दिवसभरात झपाट्याने वाढली.
रात्री उशिरा पुराचे पाणी इशारा पातळीपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे महापुराची चाहूल लागली असून, शेळके मळा, लक्ष्मी दड्ड वसाहत, जुना चंदूर रोड, बागवान पट्टी आदी परिसरात पुराचे पाणी आले आहे.
आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त प्रसाद काटकर, स्मृती पाटील यांनी पूरग्रस्त भागास भेट देऊन स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या. आता इचलकरंजी-टाकवडे मार्गावर तीन फूट पाणी आले आहे. त्यातून धोकादायक वाहतूक सुरू होती. त्यामुळे प्रशासनाने हा मार्ग आजपासून बंद केला आहे.