पावसामुळे राज्यातील अनेक नदीकाठच्या परिसरात पुरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी हजारो कुटुंबांचे प्रशासनाच्या वतीने स्थलांतर करण्यात आले असून अनेक लहान- मोठ्या उद्योगांना याचा फटका बसला आहे. कोल्हापुर, सांगलीमध्ये पुराच्या पाण्याचे राजकारण झाल्याचा प्रकार कधी ऐकीवात नाही, मात्र इचलकरंजी शहरात प्रत्येक गोष्टीचे राजकीय भांडवल करण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शहराचा विकास होण्याऐवजी बदनामी त्याचबरोबर अधोगती होत असल्याने नेतेमंडळी यातून बोध घेणार की आपला कित्ता कायम गिरवणार ? असा सवाल सर्वसामान्य नागरिकातून उपस्थित केला जात आहे.
पावसामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अनेक गावांना, शहरांना पुराचा फटका बसला आहे. त्याठिकाणी स्थानिक प्रशासनाच्यावतीने लक्ष ठेवले जात आहे. इतकेच नव्हे तर पुरग्रस्तांचे स्थलांतरही छावण्यांमध्ये केले जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी पहाणी करणे त्याचबरोबर आवश्यक त्या सूचना प्रशासनास करणे हा प्रशासकीय व्यवस्थेचा भाग आहे. सांगली असो किंवा कोल्हापुर याठिकाणी तेथील स्थानिक लोकप्रतिनीधींकडून पुरस्थितीचे कधीच राजकीय भांडवल केले जात नाही अथवा राजकारण केले जात नाही.
याउलट इचलकरंजी शहरातील सर्वच नेत्यांकडून मर्यादा ओलांडून राजकीय भांडवल करण्याचा प्रकार चिंताजनक आहे.वास्तविक महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे स्वतः तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सातत्याने भेट देऊन पुरस्थितीचा आढावा घेतला जात आहे. स्थलांतरीत कुटुंबांची रहाण्याची व्यवस्था या संदर्भात आयुक्त दिवटे यांचेकडून वारंवार संबधित विभागाला सूचना दिल्या जात आहे. पण समाज कार्याच्या नावाखाली त्याचबरोबर राजकारण डोळ्यासमोर ठेऊन काहीजणांकडून पुरस्थितीचे भांडवल करण्याचा प्रकार सर्रास केला जातो. दोन-चार फोटो काढून ते सोशल मिडियावर व्हायरल करून जणू आपणच त्यांचे तारणहार आहोत असे दाखविण्याचा प्रकार कितपत योग्य आहे, अशी विचारणा नागरिकातून केली जात आहे.पुरग्रस्तांना काही साहित्य, जेवण द्यावयाचे झाल्यास अथवा मदत करावयाची असेल तर आधी महापालिका प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून प्रशासनालाही ते सोयीचे ठरणार आहे.