इचलकरंजी येथील घंटागाडीवरील कर्मचारी संपावर; वाढत्या कचऱ्याच्या ढिगामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

इचलकरंजी येथे घंटागाडीमधून घरोघरी जावून कचरा गोळा करणारे कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनावर ठाम आहेत. त्याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे. त्यापरिणामी शहरातील विविध भागात तसेच गल्ली बोळात कचऱ्याचे ढिग साचू लागले आहेत. वाढत्या कचऱ्याच्या ढिगामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तेव्हा संप मागे घेण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने प्रयत्न करावे, अन्यथा संबंधित मक्तेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.

महानगरपालिका प्रशासनातर्फे एन. डी. के. कंपनीकडून घंटागाडीमधून घरोघरी जावून कचरा संकलन केले जाते. यासाठी २०३ कामगारांची नियुक्त केली आहे. सुट्टीचा पगार, अदा करावा या मागणीसाठी २०३ कामगारांपैकी ९४ कामगारांनी ५ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन केले आहे. कामबंद आंदालन सुरू केले असले तरी उर्वरित १०९ कामगारांसह अन्य कामगारांकडून दोन सत्रात कचरा संकलन करण्याचे काम सुरू आहे. तरी सुध्दा शहरातील अनेक गल्ली बोळातील, कचऱ्याचे ढिग साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र, कामगारांची संघटना जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहणार असे म्हटले आहे. मात्र कामगारांच्या आंदोलनामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.