कबनूर पोलीस चौकीची सुव्यवस्था राखण्याची मागणी

प्रत्येक भागात काही ना काही समस्या या आहेतच. या समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी नागरिकांमधून मागणी देखील होत असते. या मागण्या काही वेळा पूर्ण होतात तर काही वेळा दुर्लक्ष होते. इचलकरंजी येथील कबनूर गावातील वाढते शहरीकरण व विस्तारीकरण यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उदात्त हेतूने कबनूर पोलीस चौकी स्थापन झाली. कबनूर येथील कबनूर पोलीस चौकीमध्ये धूळ व घाणीचे साम्राज्य पसरल्याने चौकीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी पोलिसांना बसण्यासाठी देखील व्यवस्थित जागा नसल्याने पोलिसांना पोलीस चौकी ‘असून अडचण, तर नसून खोळंबा’ अशी स्थिती झाली आहे. तर आतमध्ये काचा व टेबलवर चक्क तेलाचा सडा पडला आहे.

याठिकाणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी क्वचितच असतात. मात्र कबनूर चौकातील अतिक्रमण व वाहतूक कोंडी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी तत्परतेने नेहमी असतात. त्यांना विश्रांतीसाठी देखील बसावे म्हटले तर चौकीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहतूक पोलिसांना भर उन्हात थांबावे लागत आहे. त्यामुळे येथील चौकीची सुव्यवस्था राखावी, अशी मागणी होत आहे.