श्री क्षेत्र जोतिबा मंदिरातील आदिमाया चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा १० ऑगस्ट रोजी होत असून, यात्रेची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू झाली आहे.यंदा श्रावणषष्ठी यात्रा पूर्णक्षमतेने होणार असल्याने यात्रेत उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने यात्रेचे नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी पाहणी करून आढवा बैठक घेऊन संबंधितांना सूचना दिल्या.
यावेळी पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार, देवस्थान समितीचे अधीक्षक धैर्यशील तिवले, कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक कैलास कोडग यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठका झाली. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यांतून सुमारे तीन लाख भाविक येतात. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यात्रा रात्रभर असते. पहाटे धुपारती अंगारा होऊन यात्रेची सांगता होते.
ग्रामस्थ, पुजारी घरे शुशोभित करताना दिसत आहे. स्थानिक दुकानदार, व्यापारी दुकानांची डागडुगी करत आहेत. आतापासूनच काही व्यापारी नारळ मेवामिठाईसह प्रसादाचे साहित्य भरू लागले आहेत. वाहनांच्या पार्किंगसाठी दरवर्षी सपाटीकरण करण्यात येते. पण यंदा सलग पावसामुळे अडचणी येत आहेत. मात्र, कालपासून पावसाने उघडीप दिल्याने हे काम सुरू आहे. यात्रेत भाविकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. साथीच्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य पथके सज्ज ठेवली जाणार आहेत. डोंगरावर स्वच्छतेबरोबर पाण्याचे शुद्धिकरणही केले जाणार आहे.
काल पन्हाळा गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांनी डोंगरावर येऊन गल्लोगल्ली गटरींची स्वच्छता, शौचालये तसेच पिण्याच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या ठिकाणी पाहणी करून त्रुटी दूर करण्यासाच्या सूचना संबंधितांना दिल्या. येत्या आठवड्यात षष्ठी यात्रेची चौथी आढावा बैठक प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. पुढील आठवड्यात यात्रेची अंतिम बैठक जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत होणार आहे.
जोतिबा डोंगरावर १० ऑगस्ट रोजी श्रावण षष्ठी यात्रा होत आहे. त्यामुळे यात्रेत मोठी गर्दीत होणार आहे. त्या दृष्टीने पोलीस अधीक्षक डॉ. महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेत बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येईल. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामस्थ, पुजारी, भाविक यांनी प्रशासनाला सहकार्य करावे.