NCERT च्या रिपोर्टमध्ये आला नवा फॉर्म्युला,फक्त १२वीत अभ्यास करून भागणार नाही!

काही दिवसात १२वीच्या निकालात ९वी, १०वी आणि ११वीचे गुण देखील महत्वाची भूमीका बजावू शकतात. NCERT चे युनिट PARAKH ने तयार केलेल्या एका रिपोर्टमध्ये यांसंबधीची शिफारस करण्यात आली आहे.यामध्ये ९वी, १०वी आणि ११वीचे गुण हे १२वीच्या निकालामध्ये देण्यात यावेत अशी शिफारस करण्यात आली आहे, तसेच याच आधारावर १२वीचा निकाल तयार केला जावा असेही सुचवण्यात आले आहे.

एक्स्प्रेसने दिलेल्या रिपोर्टनुसार, शिक्षण मंत्रालयाला ही रिपोर्ट सुपूर्द करण्यात आली आहे. यामध्ये ९, १० आणि ११ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारावर १२ वीचा निकाल तयार केला पाहिजे. जर या तीन वर्गात विद्यार्थी चांगले गुण मिळवले आणि ते वर्गात नियमीत असतील तर त्यांना याचा फायदा १२वीच्या निकालामध्ये मिळाला पहिजे. NCERT चे यूनिट परखने याबद्दलची शिफारस केली आहे. परखची स्थापना मागिल वर्षी करण्यात आली होती.

PARAKH च्या रिपोर्टमध्ये शिफारस करण्यात आली आहे की, विद्यार्थ्यांच्या ९वी, १०वी आणि ११वीच्या वर्गातील कामगिरीच्या आधारावर त्यांचा १२वीचा निकाल जाहीर केला पाहिजे. १२वीच्या निकालात ९वी चे १५ टक्के, १० वीचे २० टक्के आणि ११वीचे २५ टक्के व्हेटेज देण्यात यावे असेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.यासोबतच १२वीच्या गुणपत्रिकेत संयुक्त मुल्यांकन फॉर्मेटिव्ह असेसमेंट (होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, ग्रुप डिस्कशन, प्रोजेक्ट) आणि समेटिव्ह असेसमेंट (टर्म एक्झाम) यांना देखील व्हेटेज असेल.

मीडिया रिपोर्टनुसार, हा रिपोर्ट शिक्षण मंत्रालय सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांसोबत चर्चेला ठेवणार आहे. जेणेकरून सर्व आपलं म्हणणं मांडू शकतील, तसेच सर्वांची सहमती मिळाल्यानंतर हा रिपोर्ट लागू केला जाईल. एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार या शिफारसीबद्दल मागील एक वर्षात ३२ शालेय मंडळांसोत चर्चा करण्यात आली आहे.