आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा निर्धार! आमदार शहाजीबापूंच्या साथीने….

सांगोला तालुका हा नैसर्गिकरित्या दुष्काळी तालुका आहे. या भागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल करण्याचे स्वप्न स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांनी सर्वात प्रथम पाहिले होते आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून शेतकऱ्यांची सेवा केली. काल सोमवारी म्हणजेच 29 जुलै रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना ड्रोन सर्वेक्षण शुभारंभ झाला.

यावेळी आमदार शहाजीबापू पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील उपस्थित होते. यावेळी दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्यामधील पाण्यासाठी झगडणाऱ्या स्वर्गीय काकासाहेब साळुंखे पाटील यांचे सुजलाम सुफलाम सांगोला तालुका करण्याचे स्वप्न आमदार शहाजी बापूंच्या साथीने आम्ही दोघेही साकार करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी आम्ही दोघेही सदैव आग्रही राहू सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नावर नेहमीच राजकीय भूमीका बाजूला ठेवून आम्ही दोघेही सदैव शेतकऱ्यांच्या हिताचीच भूमिका घेऊ असा विश्वासही शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.