खानापूर बसस्थानकाची दुरवस्था! प्रवाशांचे हाल

सध्या सर्वत्रच पावसाचा जोर सुरु आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचल्याने त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशातच अनेक बसस्थानकाची दुरवस्था झालेली पहायला मिळते.
खानापूर गुहागर विजापूर महामार्गावरील महत्त्वाचे बसस्थानक तसेच घाटमाथ्यावरील २० ते २२ गावांतील लोकांसाठी खानापूर हे महत्त्वाचे व सोयीचे ठिकाण आहे.

मात्र, येथील एसटी आगाराची दुरवस्था झाली आहे. आगारास खासगी वाहनांचा विळखा, आगारातील खराब रस्ते तसेच स्वच्छतेच्या अभावामुळे प्रवासी त्रासले आहेत. खानापुरात शिक्षणासाठी तालुक्याबरोबरच आटपाडी व तासगाव तालुक्यातीलही विद्यार्थी मोठ्या संख्येने येत असतात. सध्या महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याचे काम चालू असल्याने येथे महिला येत असतात. त्यामुळे खानापूर बसस्थानकात दिवसभर प्रवाशांची मोठी वर्दळ जाणवते. परंतु या महत्त्वाच्या अशा बसस्थानकाच्या विकासाकडे एसटी महामंडळाने मोठे दुर्लक्ष केले आहे.

खानापूर बसस्थानकाची मोठी दुरवस्था झाली आहे. खड्डे पडले असून, तेथे बस मोठ्या प्रमाणात आदळत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. पावसामुळे या खड्ड्यांत पाणी साठत आहे. तसेच या बसस्थानक परिसरात वाहतुकीला शिस्त नसल्याने बसस्थानक आवारात खासगी वाहनेच राजरोसपणे लावलेली आढळतात. या खासगी वाहनांमुळे बस चालकांना बसेस आत-बाहेर करताना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे बसस्थानक खासगी वाहनांचा अड्डा बनले आहे.