मुलीने प्रियकराशी लग्न करु नये, यासाठी कुटुंबीयांचा अघोरी प्रकार

कोल्हापुरातील आजरा तालुक्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. आपल्या मुलीचे प्रेम संबंध असलेल्या युवकाशी लग्न होऊ नये यासाठी जादूटोणा आणि अघोरी प्रकार अवलंबल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राहुल पोवार यांनी आजरा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, भोंदू बाबासह तिघांविरोधात आजरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोंदूबाबा व रेश्मा बुगडे, शामराव बुगडे (रा. मलिग्रे, ता. आजरा) सुनील निऊंगरे कागिनवाडी (ता. आजरा) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मलिग्रे तालुका आजरा येथील राहुल पवार, रेश्मा बुगडे, शामराव बुगडे हे एकाच गावातील रहिवासी असून राहुल याचे बुगडे यांच्या मुलीचे गेले दीड वर्षांपासून प्रेम संबंध होते. याबाबत दोघांच्याही घरी सर्वांना माहिती होती. संबंधित मुलीचा प्रियकर राहुल, त्याचे नातेवाईक हे गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसह लग्नाची मागणी घालण्यासाठी बुगडेंच्या घरी गेले. त्यांनी लग्नासाठी मागणी घातली होती.

मात्र, त्याला मुलीच्या घरच्यांनी नकार दिला. काहीतरी कामधंदा कर मग लग्नाचे बघू असे सांगितले.दरम्यान, मुलीचं लग्न राहुलशी होऊ नये यासाठी सुनील निऊंगरे हा एका भोंदूबाबाच्या मदतीने जादूटोण्याचा प्रकार करू लागले. त्याचाच एक भाग म्हणून २९ सप्टेंबरला रात्री ९.३० वाजता गावातील स्मशानभूमीत जाऊन काहीतरी पुरल्याचं फिर्यादीच्या मित्रांनी राहुलला सांगितले. यावेळी राहुल काय पुरले आहे हे पाहण्यासाठी गेला असता तेथे आपला फोटो आणि मुलीचा फोटो लिंबू आणि चंदेरी रंगाचा कागद असे साहित्य पुरून त्यावर एक अंड, दारू ठेवल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर पुन्हा २८ आक्टोबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास कोवाडे मार्गावर रेश्मा बुगडे यांनी मरगुबाई मंदिराच्या साईडला जंगलात जिवंत कोंबडी, अंड आणि एक काळे बावळे झाडावर मोळा मारून लटकवलेले आढळले. यावर राहुल पोवार यांने आजरा पोलिसात जाऊन संबंधितावर तक्रार दिली. यानुसार, भोंदूबाबा आणि चौघांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून सह सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करीत आहेत.