चॅलेंजर क्रिकेट स्पर्धेमध्ये, शिरोलीच्या दिग्विजयची भारतीय ‘ब’ संघात निवड

गुवाहाटी येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील चॅलेंजर क्रिकेट स्पर्धेसाठी भारताच्या ‘ब’ संघात शिरोली (ता. हातकणंगले) येथील दिग्विजय शंकर पाटील याची निवड झाली. या निवडीने शिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून त्याच्यावर सर्वच क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दिग्विजयचे वडील शंकर परशराम पाटील हे पुणे येथील नामांकित कंपनीत अधिकारी आहेत. दिग्विजय पुणे येथे शिक्षण घेत आहे. शंकर पाटील व आई माधुरी पाटील यांनी त्याला गेल्या १० वर्षांपूर्वी पुणे येथील केन्स अकॅडमीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.

नुकत्याच पुणे येथे झालेल्या विनू मंकड करंडक क्रिकेट स्पर्धेत दिग्विजयने महाराष्ट्र संघातून सर्वोत्कृष्ट फलंदाजी करत स्पर्धेत ८१ च्या सरासरीने ६४८ धावा केल्या यामध्ये एक द्विशतक, दोन शतक व एका अर्धशतकाचा समावेश आहे. महाराष्ट्र संघाला विनू मंकड करंडक चषक जिंकून देण्यात दिग्विजयने मोलाची कामगिरी बजावली आहे.

दिग्विजयला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक अजय चव्हाण आणि केडन्स अकॅडमीचे प्रशिक्षक निखिल पराडकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यास बीसीसीआयकडून मानाची असणारी कैंप प्रदान करण्यात आली आहे. पुणे येथे नुकतेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार, संजय बजाज यांच्या हस्ते दिग्विजय पाटील याला उत्कृष्ट फलंदाज म्हणून सन्मानित केले आहे.