महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची संवाद साधण्यासाठी रविवारी (ता. ४) सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्या दिवशी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात ते मुक्कामी असतील, अशी माहिती पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी दिलीप धोत्रे यांनी दिली.सोमवारी पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत.
सप्टेंबरच्या मध्यावधीत राज्याच्या विधानसभेचे बिगूल वाजणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार असून लोकसभा निवडणुकीत मनसेने भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण, विधानसभा निवडणुकीत ते स्वतंत्र लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या अनुषंगाने राज ठाकरे सोमवारी (ता. ५) सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी तुळजापूरमार्गे ते धाराशिव येथे जाणार आहेत, असेही श्री. धोत्रे यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत ‘मनसे’ जिल्ह्यातील कोणकोणत्या मतदारसंघातून उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.