चालू वर्षांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये खूपच पर्जन्यमान असल्याने सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन या नद्यांच्या काठावरील गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत देखील झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
यावर उपाययोजना म्हणून प्रशासनाने या धरणातून वाया जाणारे पाणी हे खानापूर, आटपाडी, जत या दुष्काळी भागात सोडावे जेणेकरून या दुष्काळी भागात पाण्याचा तुटवडा भासणार नाही आणि नदीकाठच्या गावात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही. त्यामुळे हे अतिरिक्त पाणी सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी व जत या दुष्काळी भागात फिरवावे अशी मागणी राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे.