खराब रस्त्यांवरून काँग्रेस आक्रमक! हातकणंगले तालुक्यात ठिय्या आंदोलन सुरू……

कोल्हापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खराब रस्त्यांवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसकडून आज पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यांतून या महामार्गावर ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे.सध्या या महामार्गाचे काम सुरू असले तरी सेवा रस्ते (सर्व्हिस रोड) अत्यंत खराब आहेत.

तरीही टोल वसुली चालू असल्याने काँग्रेस आता रस्त्यावर उतरली आहे. जोपर्यंत रस्ते चांगले होत नाहीत; तोपर्यंत टोल देऊ नका, असं आवाहन करत कोल्हापुरात किनी टोल नाका येथे काँग्रेस कार्यकर्त्यांसह नेत्यांनी ठिय्या मारला आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन हातकणंगले तालुक्यातील किणी टोल नाका येथे सुरू झाले आहे. आंदोलनादरम्यान जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन स्थळावरून मागे हटणार नाही, अशी भूमिका घेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी खर्डा भाकरी आणत रस्त्यावर ठिय्या मांडला आहे.

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजुबाबा आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, राहुल (पी. एन.) पाटील, शहराध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनीही रस्त्यावर ठिय्या मारला आहे.