गटारी अन् चिकन मटणाचा फक्कड बेत! लोकांची दुकानावर मोठी गर्दी…..

आज गटारी अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या आणि रविवारचा दिवस आल्यामुळे मुंबईतील लालबागच्या चिकन आणि मटन दुकानांच्या बाहेर मोठी गर्दी बघायला मिळत आहे. अनेक खवय्ये या ठिकाणी रांगा लावून चिकन-मटण विकत घेण्यासाठी थांबलेले दिसतात.आज घरी चिकन आणि मटनाचा फक्कड बेत असणार आहे.

महाराष्ट्रात मराठी कॅलेंडरनुसार, आषाढ महिन्याच्या अमावास्येला गटारी अमावस्या साजरी केली जाते. श्रावण मासात पुढील ४० दिवस मांसाहार आणि मद्यपान बंद केले जाते. त्यामुळे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावास्येला मांस-मदिरा सेवन केले जाते. यंदा गटारी अमावस्या ४ ऑगस्ट २०२४ रोजी साजरी केली जात आहे. यानंतर महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात होते.
गटारी अमावस्या साजरी करण्यामागचे कारण

गटारी अमावस्या साजरी करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे श्रावण महिन्यात रोगराईचा धोका वाढतो. कारण हा महिना पावसाळ्याचा असतो. त्यामुळे या महिन्यात लोक हलके आणि सात्त्विक अन्न खाणे पसंत करतात. गटारी अमावस्या या दिवशी कुटुंबीय एकमेकांच्या घरी जेवणासाठी जातात.

गटारी अमावस्या हा सण महाराष्ट्रातील खवय्यांसाठी एक विशेष दिवस आहे, ज्यामध्ये ते आपल्या मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसोबत आनंदाचा क्षण साजरा करतात.