बेदाणे किलोमागे दहा रुपयांनी वाढला श्रावण गोकुळाष्टमी सणानिमित्त मागणीत वाढ…..

आगामी दिवसांत श्रावण आणि गोकुळाष्टमी सणानिमित्त बाजारपेठेत बेदाण्याच्या खरेदीसाठी व्यापारी नियोजन सुरू केले आहे. यामुळे गेल्या आठवड्यापासून बेदाण्याच्या दरात प्रतिकिलोस दहा रुपयांनी वाढ झाली आहे.सध्या बेदाण्याला प्रतिकिलोस १२० ते २४० रुपये असा दर मिळत आहे. सणानिमित्त मागणी वाढू लागल्याने दरातही वाढीची अपेक्षा बेदाणा उद्योजकांनी व्यक्त केली.राज्यात बेदाण्याचे २ लाख २० हजार टन उत्पादन झाले आहे. फेब्रुवारीपासून जुलैअखेर सुमारे १ लाख १६ हजार टन बेदाण्याची विक्री झाली असल्याचा अंदाज तासगाव बाजार समितीने व्यक्त केला आहे.

सध्या सांगली, तासगाव, पंढरपूर बेदाण्याच्या बाजारपेठेतील शीतगृहात १ लाख ४ हजार टन बेदाणा शिल्लक आहे. त्यामुळे नवीन बेदाण्याचा हंगाम सुरू होईपर्यंत बेदाणा पुरवठा येईल. तासगाव, सांगली आणि पंढरपूर या बाजारपेठेत सौद्याला एक हजार टन आवक होत असून ५० टक्के बेदाण्याची विक्री होत आहे.गत आठवड्यात बेदाण्याला प्रतिकिलोस ११० ते १५५ रुपये दर होता. यामध्ये दर्जेदार बेदाण्याला प्रतिकिलोस २३० रुपये दर मिळत होता. सणानिमित्त बेदाण्याची मागणी किंचित वाढली असल्याने बेदाण्याच्या दरात प्रतिकिलोस १० रुपयांनी वाढ झाली आहे.

बेदाण्याचा बाजारपेठेत दर्जेदार बेदाण्याची आवक फार कमी असते. त्यामुळे स्पर्धेतून दर्जेदार बेदाण्याला चांगले दर मिळतात. त्यानुसार शेतकरी बेदाण्याची प्रतवारी करून विक्रीसाठी ठेवला जातो. तासगाव, सांगली आणि पंढरपूर या तीन बाजारपेठेत सौद्याला सध्या अंदाजे ११ टन बेदाण्याची आवक होते. दर्जेदार बेदाण्याच्याही दरात प्रतिकिलोस १० रुपयांनी वाढ झाली आहे.
बेदाण्याला मागणी स्थिर असून उठावही चांगला होत आहे. श्रावण आणि गोकुळाष्टमी सणानिमित्त बेदाण्याची मागणी वाढत आहे. यामुळे बेदाण्याच्या दरात प्रतिकिलोस दहा रुपयांनी वाढ झाली आहे. येत्या काळात बेदाण्याचे दर वाढतील, अशी अपेक्षा आहे, असे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले.