काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या वानखेडे कार्यालयात आयपीएल अधिकारी आणि संघ मालक यांच्यात बैठक झाली. या बैठकीला काही संघांचे मालक बीसीसीआय कार्यालयात उपस्थित होते तर काही जणांनी ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला. या सर्वदरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे. मुंबई इंडियन्स कर्णधार हार्दिक पांड्याला बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याची चर्चा रंगली आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पांड्याला पुन्हा आपल्या संघात सामील केले होते. तसेच फ्रँचायझीने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेत हार्दिक पांड्याकडे जबाबदारी दिली.
मात्र गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आले. आता मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबई इंडियन्सला रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना कोणत्याही किंमतीत सोबत ठेवायचे आहे. अशा परिस्थितीत फ्रँचायझी हार्दिक पांड्याला सोडणार आहे, कारण सूर्यकुमार आता टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे.
अशा परिस्थितीत फ्रँचायझी आपल्या संघाची कमान त्याच्याकडे सोपवू शकते. रोहितही सूर्याच्या नेतृत्वाखाली खेळण्यास सोयीस्कर असेल. मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 साठी सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवू शकते, असे या अहवालात म्हटले जात आहे. फ्रँचायझीला आता नवीन संघ तयार करायचा आहे यात शंका नाही. अशा स्थितीत आगामी हंगामात संघात अनेक नवीन खेळाडू पाहायला मिळू शकतात.